Tuesday, March 3, 2009

सखे

नको वेळ लावू सखे बोल आता
मनाची कवाडे जरा खोल आता

तुझे चिंब होणे मला आवडे पण
कुणी सावरावा कसा तोल आता

जगाला कळाले किती चांगला मी
तुलाही कळूदे ख्ररे मोल आता

इथे वेदनांचे उमाळे उसासे
कुठे डोळियांना खरी ओल आता

असे भावनांनी गडे घे उ़खाणे
सुखाला मनाच्या पुरे सोल आता

गझल माझी तसतशी

पाहुनी उत्साह माझा सुन्न होते
उम्र होण्याचीच माझ्या उम्र होते

फार अंतर भेटण्यामध्ये नसावे
प्रेम राही बाजुला अन झुंज होते

पाडले ज्या ज्या शहाण्यांना इथे मी
खालच्या बाजूस त्यांच्या उंट होते

केवढा पिवळा अताशा वाटशी तू
सापडावे जे जुने हळकुंड होते

काय या देहात जादू कोण जाणे?
मद्य जाते आत आणी धुंद होते

काय या मद्यात जादू कोण जाणे?
घोट जातो आत छाती रुंद होते

का मला ओलावते आहेस आता?
जन्मभर आयुष्य हे निवडुंग होते

जसजसा जमिनीमधे मी एक होतो
गझल माझी तसतशी उत्तुंग होते

पावसाची चिन्हही नाहीत येथे
वाळवंटाची हवा का कुंद होते?

चुकलेच माझे

मी कशाला जन्मलो? - चुकलेच माझे!
ह्या जगाशी भांडलो! - चुकलेच माझे!

मान्यही केलेस तू आरोप सारे,
मीच तेव्हा लाजलो! - चुकलेच माझे!

सांग आता, ती तुझी का हाक होती?
मी खुळा भांबावलो! - चुकलेच माझे!

भोवतीचे चेहरे सुतकीच होते,
एकटा मी हासलो - चुकलेच माझे

चालताना ओळखीचे दार आले..
मी जरासा थांबलो! - चुकलेच माझे!

पाहिजे पूजेस त्यांना प्रेत माझे!
मी जगाया लागलो! - चुकलेच माझे!

वाट माझ्या चार शब्दांचीच होती..
मी न काही बोललो! - चुकलेच माझे!

रंग माझा वेगळा!

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !